“संशयाच्या ठिणगीने उजाडलेलं घर…”

ह्याला तिच्यावर संशय, तिलाही त्याच्यावर संशय,
दोघांच्या मनागूटावर होतं संशयाचं भूत.
तो पिऊन बडबडायचा, तीला न पिताच चढायची,
मग काय — रात्रभर दोघांचा वादविवाद,
पोरं मात्र उपाशी तशीच झोपायची.

नेहमीच असायचे ह्यांचे आरोप-प्रत्यारोप,
पण आज वाद भलताच पेटला.
दोघांनीही उडवले चारित्र्यावर शितोडे,
शाब्दिक शस्त्राने लुटली इज्जत,
एकमेकांच्या फोनची केली तपासणी,
घरातल्या वस्तूंची तोडफोड केली,
अक्षरशः शेवटी आज हातापाई झाली.

दोघांनीही संपूर्ण रात्र जागून काढली,
अपशब्दांनी मुलांच्या मनावर झाला घात.
त्यांना नव्हतं समजत — कशामुळे होतोय वाद.
सकाळ झाली, पण घरात अंधार तसाच राहिला.

तोही बिना डब्याच्या निघून गेला कामाला,
उपाशी मुलांनी चहा आईकडे मागितला,
तीने अंगावरील माराचे वणं कसेबसे लपवले,
मुलांना घेऊन सरळ माहेर गाठले.

त्यानेही सायंकाळी दारूचा अड्डा पकडला.
लग्नापूर्वीचं प्रेम आणि प्रेमानंतरचं लग्न,
दोघांच्या सहमतीने थाटला होता संसार,
पण वाढत गेलं अंतर एकमेकांच्या प्रेमातलं.

घरच्यांच्या विरोधात जाऊन केलेलं लग्न,
तीन-चार वर्ष पण नाही टिकू शकलं.
खरंच, प्रेम किती आंधळं असतं,
मागचा-पुढचा विचार न करता सहज जुळतं.

विश्वास असेल तर सुखावतं,
नसेल तर तेही रक्ताचे अश्रू मागतं.
दोघांच्या वाटा झाल्या वेगवेगळ्या,
पुन्हा कोर्टात येऊन पोहोचल्या.

पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप,
पुन्हा चारित्र्यावर शंका.
काडीमोड झाला संसाराचा
संशयाच्या ठिणगीने जळालं घर,
हसतं-खेळतं आयुष्य उजाड झालं.

“आई-बाप जिवंत असताना,
मी मुलांना अनाथ होताना पाहिलं…”

– भागवत

Overall Rating
4.5

Rating

एकांतात … भावना… आणि शब्दांचा कोमल आधार…

One comment on ““संशयाच्या ठिणगीने उजाडलेलं घर…”

Comments are closed.