जन्मताच उडालं मायेचं छप्पर,
सोडून गेला देह.
पोरके झाले नवजात अर्भक,
आईचं दूध झालं परकं.
काय त्या लेकरांचा अपराध?
कोठे शोधेल मायेचा पदर?
पोटात जाणारा हात गेला अंधारात,
भूक कशी मिटेल?
चिमणी गेली उडून भूर,
पाखराला चारा आणून देईल कोण?
आई म्हणून कोणाला मारेल हाक,
कोणाच्या कुशीत झोपेल बाळ?
अंगाई नाही पडली कानी,
कशी लागेल गाढ झोप?
किती रडेल झोपेतून उठल्यावर,
कवेत घ्यायला नसेल माय.
शिकवेल कोण पाटी गिरवायला,
कोण असेल शाळेत सोडायला?
जीवनाचं सार सांगेल कोण?
हरपले कौतुकाचे बोल.
चूक झाल्यावर ना कोणी ओरडायला,
मारले कोणी तर नाही भांडायला.
कोण असेल खाऊ द्यायला,
वाढदिवसाच्या दिवशी ओवाळायला?
जन्मताच सोडून गेली,
नजरेत नाही पडला चेहरा.
कसा करेल वाढदिवस साजरा?
जन्मताच गेला
स्मशानात आईला सोडायला.
निघाला हुंदक्यावर हुंदका,
किती वाहिल्या असतील धारा…
जन्म दिला तिनं—
केला गुन्हा काय?
लेकराला सोडून जाताना,
किती तडपली असेल माय…
— भागवत
आई विना व्यर्थ सारे जीवन…